धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बडगुजर गल्लीत राहणाऱ्या एका तरुणाची लग्नाच्या नावावर दीड लाख लाखात फसवणूक करणाऱ्या एका टोळीला गजाआड करण्यात आले आहे. यामध्ये एका महिलेसह दोन पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील महिला आरोपीला धरणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने औरंगाबाद बस स्थानकाहून फरार होण्याच्या प्रयत्नात असताना सापळा रचून अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की २२ नोव्हेंबर २०२० रोजी रवींद्र भगवान बडगुजर (रा. बडगुजर गल्ली, धरणगाव) यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती की, लग्नाच्या नावावर त्यांची दीड लाखात फसवणूक झालेली आहे. याबाबत त्यांनी श्वेता वैजनाथ डुबुकवडे, अर्जुन बाबुराव नन्नवरे, आनंदा अहिरे तसेच त्यांच्या इतर साथीदारांना विरुद्ध भादवि कलम ४२० आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक जे.एम.हिरे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कॉन्स्टेबल सय्यद करीम सय्यद अहमद यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्यांच्या सोबत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल विद्या पाटील यांना देखील आरोपीच्या शोध घेणे कामी औरंगाबादकडे रवाना केले होते. गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपी महिला औरंगाबादहुन दुसरीकडे पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी बसस्थानकावर सापळा रचून मोठ्या शिताफीने तिला अटक केली. तर उर्वरित दोघे आरोपी हे धरणगाव तालुक्यातील असल्याने त्यांनाही आज अटक करण्यात आली आहे. दरम्यान या तिघा आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पुरुष व स्त्रियांची गुणोत्तरात मोठी तफावत असल्याने बऱ्याच मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा लग्नासाठी मुली शोधणाऱ्या मुलाचे आईवडील व नातेवाईक एजंट लोकांशी संपर्क साधून लग्नासाठी चांगली मुलगी शोधून देण्याचे विनंती करतात. या बदल्यात एजंट त्यांच्याकडून एक ते दोन लाख रुपयांची व दागिन्यांची मागणी करतात. तसेच लग्नानंतर सदर मुलगी माहेरी जाण्याच्या निमित्ताने फरार होत असते. तरी सर्व नागरिकांनी अशा लोकांपासून पासून सावध राहावे. पैसे देऊन मुली लग्न शोधून नयेत, असे आवाहन धरण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.















