
जळगाव (प्रतिनिधी) – कारमधून १२ लाख ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते अनिल मंधान यांच्या घरापर्यंतचे सीसीटीव्ही तपासले. यामध्ये संशयित चोरटे त्यांचा पाठलाग करीत असल्याचे आढळून असून ते छत्रपती संभाजीनगरकडून जळगावात निष्पन्न झाले आहे. बॅग चोरतांना चोरट्यांनी चेहरा झाकलेला नसल्यामुळे ही टोळी आंध्रप्रदेशातील असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला असून पथक त्यांच्या मागावर आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमील होलसेल फळविक्रेते अनिल ओमप्रकाश मंधान हे दि. ३ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकानातील १२ लाख ५० हजारांची रोकड घेवून (एमएच ४६, बीव्ही ३२९५) क्रमांकाच्या कारने घरी निघाले. घराजवळ आल्यानंतर गाडी पार्क करीत असतांना समोरुन आलेल्या एकाने त्यांना तुमच्या गाडीतून ऑईल लिक होत असून धूर निघत असल्याचे सांगितले. त्यामुळे मंधान हे बघण्यसाठी खाली उतरताच मागावर असलेल्या चौघांनी त्यांच्या कारमधून १२ लाख ५० हजार रोकड असलेली बॅग चोरुन ते दुचाकीवरुन पसार झाले. मंधान यांनी पाठलाग केला, मात्र चोरटे भरधाव वेगाने ईच्छादेवी चौफुलीच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरा अनिल मंधान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगरकडून दुचाकीने आले चोरटे
हे चोरटे छत्रपती संभाजीनगरकडून जळगावात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तसेच चोरी करतांना त्यांनी चेहरे बांधलेले नसल्यामुळे ते स्थानिक नसून परराज्यातील असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात असून त्यानुसार त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
चोरटे आंध्रप्रदेशातील असल्याची शक्यता
काही महिन्यांपुर्वी दुचाकीच्या डिक्कीतून कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला असलेल्याच्या डिक्कीतून लाखो रुपयांची रोकड चोरुन नेली होती. या घटनेत देखील चोरट्यांनी चेहऱ्याला काहीही न बांधता चोरी केली होती. दरम्यान, गणपती नगरातील घटना देखील त्याच पद्धतीने केल्यामुळे ही चोरी आंध्र प्रदेशातील टोळीनेच केल्याचा पोलिसांना संशय आहे.
एलसीबीसह रामानंद नगर पोलिसांचे पथक रवाना
घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळासह मंधान यांच्या दुकानापासून ते घरापर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये त्यांना दोन दुचाकीवरुन आलेले चार संशयित हे त्यांच्या कारचा पाठलाग करतांना दिसत आहे. पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले असून त्या चोरट्यांच्या शोधार्थ रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.

















