धरणगाव (प्रतिनिधी) येथे महाराष्ट्र चर्मकार महासंघाच्या वतीने आज संत रोहिदास समाज कल्याण महामंडळ जळगाव यांच्यावतीने गठई कामगार स्टॉल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी ज्या कामामुळे आपल्याला अस्पृश्य म्हणून हिणवले जात असेल ते काम आपण सोडून द्यायला पाहिजे, असे चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे होते. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, धरणगाव नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख पी. एम. पाटील सर, गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्ष विलास महाजन, माजी पंचायत समिती सभापती दीपक सोनवणे, समाज कल्याणचे विलास भावसार, किशोर माळी, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेविका अंजली विसावे, चर्मकार महासंघाचे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता लिंडायत, विजया महाले, प्रियंका गजरे, कल्पना विसावे, महाले सर, माजी नगरसेवक धुरेकर, गोपाल विसावे सर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनेक गरजू व समाजातील होतकरू अशा गठई कामगारांना स्टॉलचे वितरण प्रमुख अतिथी यांच्याहस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमामध्ये समाजातील नीट परीक्षेमध्ये 470 गुण मिळवलेले मेघराज महाले, इयत्ता दहावी मध्ये 95. 20 गुण मिळवून तालुक्यात मागासवर्गीयांमध्ये प्रथम आलेली जयश्री नवल महाले व पूजा जगदीश धुरेकर हिला 90 टक्के मिळाल्यामुळे या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना भानुदास विसावे यांनी कार्यक्रमाची रुपरेखा व भूमिका मांडली. अध्यक्षीय भाषणामध्ये गुलाबराव वाघ यांनी सर्व कामगारांना उत्कृष्ट कामाची प्रेरणा दिली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. महाले यांनी केले तर आभार दीपक सोनवणे यांनी मानले.