धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावचा सर्व्हे झालेला आहे. कोण निवडून येईल आणि कोण पराभूत होईल, हे मला आजच माहीत आहे,” असे सांगत स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत संकेत दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव नगरपालिकेवर गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे आणि तो पुढेही फडकतच राहील. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. तिकीट वाटपात पारदर्शकता राखली जाईल. पुढे ते म्हणाले की, “उमेदवार माझ्या मनात ठरले आहेत. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणालाही तिकीट देणार नाही. जनतेने कार्यकर्त्याला डोक्यावर घेऊन माझ्याकडे यावे आणि म्हणावे ‘भाऊ, यांना तिकीट द्या.’” तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत असल्याचे सांगत, “गुलाबराव देवकरही आता आपला प्रचार करतील,” असेही त्यांनी सांगितले.
गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला
खासकरून कुणाला वाटत असेल की फार हवेत आहे. फार माझी चालते आहे. पण तू खाली काय केले आहे, हे गावातील सगळं सर्व्हे सांगून गेला आहे, असे देखील गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्या या भाषणामुळे धरणगावातील राजकीय वातावरणात आगामी निवडणुकांबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. दरम्यान, या वक्तव्यामुळे अनेक इच्छुकांचा जीव टांगणीला पडला आहे.
















