जालना (वृत्तसंस्था) जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी एका वृद्धाच्या अंगावर रात्री झोपेतच अॅसिड टाकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना म्हसरूळ (ता. जाफराबाद, जि. जालना) येथे घडली. श्रीरंग हरीबा शेजूळ (८५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाफराबाद ठाण्यात उत्तम श्रीरंग शेजूळ (३२ रा. म्हसरूळ) यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की, वडील श्रीरंग हरीबा शेजूळ हे १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात बाजेवर झोपले होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने ते चुलतभावाला सोबत घेऊन धावत घराकडे आले. त्यावेळी उत्तम शेजूळ यांना वडिलांच्या संपूर्ण अंगावर कसले तरी द्रव टाकलेले दिसले आणि अंग भाजत असल्याने ते ओरडत होते.
आजुबाजूला बघितले असता कुणीही दिसून आले नाही. त्यानंतर वडिलांना जाफराबाद ग्रामीण रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गावातील संशयित नंदू किशोर शेजूळ याने तीन महिन्यांपूर्वी आमच्या कुटुंबाला धमकी दिली होती. तसेच नंदू भटकर साबळे (रा. म्हसरूळ) यानेही यापूर्वी वडिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनीच वडिलांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशा ज्वलनशील पदार्थ टाकले असल्याचा आरोप उत्तम शेजूळ यांनी फिर्यादीत केला आहे.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी संशयित नंदू किशोर शेजूळ (३३) याच्या घरातून अॅसिड जप्त केले असून, त्याला अटक केली आहे. तसेच संशयित आरोपींविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा सोमवारी (दि.१८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी श्रीरंग शेजूळ यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.