पिंपरी (वृत्तसंस्था) मोबाईल गेममध्ये टास्क पूर्ण करण्यासाठी दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पिंपरी-चिंचवड परिसरातील किवळे येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आर्य उमेश श्रीराव (१५, रा. रुणाल गेटवे सोसायटी, किवळे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
खोलीत एकटाच बडबड करायचा !
आर्य याचे वडील आयटीमध्ये असून, आई गृहिणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आर्य मोबाईल आणि काही गेमच्या आहारी गेला होता. तो दिवसरात्र लॅपटॉपवर असून, त्याच्या वागण्यातही बदल झाले होते. तो त्याच्या खोलीत स्वतःला कोंडून घेत होता. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. दरम्यान, अतिवृष्टीमुळे २५ जुलैला शाळांना सुट्टी होती, तो दिवस त्याने गेम खेळण्यात घालवला. रात्री विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यानंतर पुन्हा तो खोलीत गेला.
डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले !
लहान मुलाला ताप आल्याने त्याची आई चिंतेत होती. रात्रीचा एक वाजला तरीदेखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागीच होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज आला. एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडल्याचा उल्लेख मेसेजमध्ये होता. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला. ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा खोलीत नव्हता. त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली. जखमी अवस्थेत पडलेला त्यांचाच मुलगा आर्य होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान हा प्रकार नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे. तसेच लॅपटॉप व इतर तांत्रिक तपास केल्यानंतर नेमके कारण समोर येईल, असे रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी सांगितले.
सहा महिन्यांपासून लागले होते गेमचे वेड !
गेल्या सहा महिन्यांपासून त्याला गेमचे वेड लागले असून, तो सतत लॅपटॉप घेऊन बसत असे. अनेकदा स्वतःला कोंडून एकट्यात बोलत असे. अतिशय शांत आणि भित्रा असलेला आर्य अचानक आक्रमक होऊ लागला. तसेच आग आणि चाकूसोबत खेळू लागला. यापूर्वी घरच्यांचे नेहमी ऐकून घेत असे, मात्र काही महिन्यांपासून तो आक्रमक झाला व चिडचिड करू लागला. तो उंचावर जायला घाबरत असे, मात्र थेट चौदाव्या मजल्यावरून उडी घेण्याचे धारिष्ठ्य त्यामध्ये आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेला एक कागद आढळला !
घरात लॅपटॉप वर एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेला एक कागद आढळला. त्या कागदावर त्यांच्या घराच्या नकाशासदृश चित्र रेखाटले होते. ज्या ठिकाणी घराची गॅलरी होती त्या ठिकाणी ‘जम्प’ असे लिहिले होते. त्याच ठिकाणाहून आर्य याने उडी मारल्याने त्याला आत्महत्येचा टास्क दिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.