मुंबई (वृत्तसंस्था) विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देत असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे बेजबाबदार विधान केलं आहे. आपण रेमडेसीवीर बाबत बोलू शकतो. ऑक्सिजन बाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल, असं धक्कादायक विधान टोपे यांनी केलं आहे.
दरम्यान, टोपे यांच्या या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवाल दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, विरार दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटूंबाला राज्य सरकारकडून पाच लाख आणि वसई-विरार महापालिकेकडून पाच लाखाची अशी दहा लाखांची मदत करण्यात येणार असल्याचं राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यातील सर्व रुग्णालयातील व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. मी तसे आदेश सर्वाना दिले आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकार गंभीर आहे, सर्व गोष्टींची दखल घेण्यात आली आहे. सरकार कॅज्युअल आहे अशातला भाग नाही, असं त्यांनी टोपे यांच्या विधानवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं.
















