धरणगाव (प्रतिनिधी) येथील लहान माळी वाडा परिसरातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची आज जगद्गुरू तुकोबाराय बिजनिमित सांगता सोहळा उत्साहात संपन्न झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील ३३ वर्षांपासून जगद्गुरू तुकाराम महाराज बिजनिमित अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची परंपरा यावर्षी ३४ व्या वर्षी देखील तेवढ्याच उत्साहात संपन्न झाली. कै.शंकर विठ्ठल पाटील, कै.शांताबाई शंकर पाटील, कै. शरद शंकर पाटील, कै. प्रभाकर शंकर पाटील, कै.रविंद्र शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ राजेंद्र शंकर पाटील यांच्याकडून अखंड हरिनाम किर्तन सप्ताह दरवर्षी पार पडत असतो. त्याचप्रमाणे कै.अर्जुन किसन पाटील यांच्या स्मरणार्थ भिमराज अर्जुन पाटील यांच्याकडून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचे पारायण ह.भ.भ. संजय महाराज वाघ यांच्या अमोघ वाणीतून संपन्न झाले. दि.१३ मार्च पासून सुरू झालेल्या बीज सप्ताहाची सांगता आज ह.भ.प. मनोज महाराज कुलकर्णी (जळगाव) यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचे किर्तन संपन्न झाले. काल्याच्या किर्तनातून थोडा वेळ काढून सप्ताहासाठी ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले अशा सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी कोरोना काळात सोडून गेलेल्या सर्व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये समाजाचे दोन माजी अध्यक्ष विठ्ठलआबा आणि सुकदेव आण्णा तसेच युवकांचे मार्गदर्शक भिकन अण्णांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून निघणारी नाही. समाजातील ज्या लोकांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्यांना श्रद्धांजली रडून नाही तर लढून व्यक्त केली पाहिजे. याच भावनेतून समस्त कुणबी पाटील समाज मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण शिवजयंती निमित्त करून खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली गेली. २६ जानेवारी रोजी कै.सुकदेवआण्णा काशिराम पाटील यांच्या स्मरणार्थ अशोक सुकदेव पाटील, किशोर सुकदेव पाटील, हेमेंद्र सुकदेव पाटील यांच्याकडून राजमाता जिजाऊ अन्नपूर्णा योजनेची सुरवात करण्यात आली. यावर्षी बिजसप्ताहाची पंगत कै.विठ्ठलआबा शिवलाल पाटील यांच्या स्मरणार्थ जालंदर विठ्ठल पाटील, बाळू विठ्ठल पाटील, महेंद्र विठ्ठल पाटील व गणेश विठ्ठल पाटील यांच्याकडून देण्यात आली. पंगत करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल आबांच्या परिवाराने राजेंद्र शंकर पाटील यांचे ऋण व्यक्त केले. बिजनिमित आयोजित महाप्रसादाचा असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला.
दि. १३ मार्च २०२२ ते २० मार्च २०२२ दरम्यान संपूर्ण लहान माळी वाडा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सकाळी काकडा आरती ९ ते ११ आणि ३ ते ५ दरम्यान गाथा पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री किर्तन सेवा असा नित्यक्रम ठरलेला होता. या सर्व कार्यक्रमात महिला भगिनी – पुरुष बांधव आणि विशेष म्हणजे युवकांचा उत्साह अवर्णनीय होता. आज सायंकाळी जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे संयोजन ह.भ.प.सी.एस.पाटील सर (धरणगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमाचे आयोजन समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त कुणबी पाटील समाजाचे जेष्ठ संचालक माधवराव पाटील यांच्यासह अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सहसचिव दिनेश पाटील, संचालक चुडामण पाटील, राजेंद्र पाटील, दत्तू पाटील, मोहन पाटील, कैलास पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, अशोक पाटील, वाल्मीक पाटील, मंगेश पाटील, परशुराम पाटील, आनंद पाटील, जितेंद्र पाटील, रतनराव पाटील, गुलाब पाटील यांच्यासह समाजातील सर्व नवयुवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले.