
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरप्रकारांकडे आमदार एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात लक्ष वेधले आहे. आमदार खडसे यांनी शासनाला प्रश्न विचारला होता की, या प्रकरणी १०० व्यक्तींना चौकशी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत का? तसेच, या बनावट आयडीद्वारे वेतन वितरण आणि इतर प्रशासकीय गैरप्रकार झाले आहेत का? दोषींवर काय कारवाई करण्यात आली आणि भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी कोणती सुरक्षा उपाययोजना केली आहे?
या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले की, अमळनेर तालुक्यातील या प्रकरणात १०० व्यक्तींना चौकशी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नाशिक रोड, नाशिक येथे २७ मार्च २०२५ आणि १२ मार्च २०२६ रोजी अनुक्रमे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यात हे गैरप्रकार रोखण्यासाठी शालार्थ आयडी तयार करताना आधार लिंक मोबाईल ओटीपी (OTP) सुविधा अनिवार्य केली आहे. तसेच, ई-ऑफिस प्रणालीचा वापर, एन.आय.सी. (NIC) कडील संच मान्यता एपीआय (API) द्वारे शालानिहाय पोस्ट मॅपिंग आणि १२ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्यासाठी सुधारित कालमर्यादा निश्चित करण्यात आली असल्याचे शासनाने नमूद केले आहे.
















