जळगाव (प्रतिनिधी) सासऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर शेतजमिनीला वारस लावण्यावरुन वाद झाल्याने तौफिक कय्यूम पिंजारी (वय ३२, रा. सदाशिवनगर, शेरा चौक मेहरुण) या तरुणावर त्याच्या मेव्हण्यांनी वार केले होते. यामध्ये तौफिक हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याची प्रकृती खालावत असल्याने तीन दिवसानंतर सोमवार दि. १४ एप्रिल रोजी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्ह्यात खूनाचे कलम वाढविण्यात आले असून फरार असलेल्या त्याच्या मेव्हण्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
शहरातील मेहरुण परिसरातील सदाशिवनगरात तौफिक पिंजारी हा वास्तव्यास होता. मालवाहू रिक्षा चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. काही दिवसांपासून तौफिक पिंजारी हे त्यांचे मेहुणे अस्लम सशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी यांच्यामध्ये शेत जमिनीला वारस लावण्यावरून वाद झाले होते. दि. ११ एप्रिल रोजी तौफीक यांच्या घरी जाऊन त्यांना दोन्ही मेहुण्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली होती. यात अस्लम याने तरुणाच्या पोटाच्या डाव्या बाजूला कमरेजवळ चाकूने वार केला होता.
दुसऱ्या रुग्णालयात हलविले
दि. ११ एप्रिलपासून तौफीक यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतू उपचारादरम्यान, दि. १३ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पिंजारी कुटुंबियांनी त्यांना नेले, मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तौफिक पिंजारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पसार मेव्हण्यांचा पोलिसांकडून शोध
शेतीच्या वादातून अस्लम सशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी या दोघांनी त्यांचा शालक तौफिक पिंजारी याच्यावर वार केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र उपचार सुरु असतांना तौफिकचा मृत्यू झाल्यामुळे या गुन्ह्यात खूनाचे कलम वाढविण्यात आले असून पसार असलेल्या त्यांच्या मेव्हण्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज
गंभीर जखमी असलेल्या तौफिक पिंजारी यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना दि. १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
दोन महिन्यांपूर्वी झाले वडिलांचे निधन
तौफीक पिंजारी यांच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वीच हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांमध्ये शेतीला वारस लावण्यावरून वाद सुरू झाले होते. हा वाद विकोपाला गेल्याने दि. ११ एप्रिल रोजी वाद वाढत जाऊन तौफीक यांच्यावर थेट मेव्हण्यांनीच चाकूने वार केले होते. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. तौफिक यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.