जळगाव (प्रतिनिधी) जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करीत त्याचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. सुरेश परमसिंग सोलंकी (वय २५, रा. खेमला, जि. सेंधवा, मध्यप्रदेश, ह. मु. आव्हाणे शिवार), असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु असून हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.
पाच महिन्यांपुर्वी जिनिंगमध्ये आला होता कामाला !
जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची लक्ष्मी जिनिंग असून त्यांच्याकडे मध्यप्रदेशातून काही तरुण आले आहे. जिनिंगमध्ये काम केल्यानंतर हे मजूर त्याच ठिकाणी बांधलेल्या खोल्यांमध्ये वास्तव्यास असतात. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे सुरेश सोलंकी हा मजूर गेल्या चार ते पाच महिन्यांपुर्वी जिनिंगमध्ये कामाला आलेला होता. याठिकाणी मजूरी काम करुन तो स्वतःचा उदनिर्वाह करीत होता. शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश सोलंकी याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जिनिंगच्या मागील बाजूस असलेल्या भरत खडके यांच्या शेतात कुट्टीवर झाकलेल्या ताडपत्रीवर आढळून आला.
कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार !
मयताच्या डोक्याला मागील बाजूला कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार केल्याची जखम होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजून गेली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी जिनिंग कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. दरम्यान, पोलिसांनी याठिकाणाहून फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार ते संशयित. मारेकऱ्याचा शोध घेत होते.
श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण !
संशयिताचा शोधार्थ पोलिसांनी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणाहून त्यांनी काही पुरावे गोळा केले असून रक्ताने माखलेली ताडपती देखील ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या पुराव्यांवरुन श्वान पथकाने काही अंतारापर्यंत शेतातून माग दाखविला होता.
मृतदेहाजवळ आढळले मंगळसूत्र, पैंजण !
मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणाहून तीन फुटांवर पोलिसांना मंगळसूत्र, पायातील पैजण व वीस रुपयांचा डॉलर मिळून आला. तसेच मृतदेहाच्या बाजूला गुटखा, तंबाखूची पुडी आणि पैसे व पाण्याची बाटली मिळून आली. तसेच मयताच्या डोक्याला रुमाल बांधलेला होता. पोलिसांनी हे पुरावे जप्त केले असून त्यानुसार संशयिताचा शोध घेतला जात आहे.
खूनाला अनैतिक संबंधाची किनार ?
कंपनीतील मजूर पुरविणाऱ्या मनोज सोनवणे या ठेकेदाराने काही दिवसांपुर्वी सुरेश सोलंकी याला नवीन मोबाईल घेवून दिला होता. परंतु त्याचा मोबाईल सादुरुस्त झाल्याने सुरेश याने ठेकेदाराकडे तो दुरुस्तीसाठी दिला होता. दरम्यान, याठिकाणाहून महिलेचे मंगळसूत्र व पायातील पैजण मिळून आल्याने हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. दरम्यान, एका संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात होती.
शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता मृतदेह !
मयत सुरेश सोलंकी हा शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असल्याने त्याचा ठेकेदार मनोज सोनवणे हा त्याचा शोध घेत होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने आज सकाळी पुन्हा ठेकेदाराकडून कंपनीच्या परिसरात त्याचा शोध घेत होता. दरम्यान, कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या शेतात मनोज सपकाळे हा गेला असता, त्याला ताडपत्री खाली सुरेश सोलंकी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.
अधिकाऱ्यांनी जाणून घेतली घटनेची माहिती !
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, पोहेकॉ अनिल फेगडे, धनराज पाटील, प्रवीण पाटील, चेतन पाटील, अनिल मोरे, रामकृष्ण इंगळे, उमेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, नरेंद्र पाटील, विशाल जोशी यांच्याासह एलसीबीचे विजयसिंग पाटील, विजय पाटील, जितेंद्र पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
















