जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तीन महिने अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लखन उर्फ विजय रमेश गायकवाड (वय २४,रा.भडगाव) असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास व ४३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय. जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी बुधवारी हा निकाल दिला.
या संदर्भात अधिक असे की, लखन गायकवाड याने २५ मे २०१८ रोजी पीडितेला फूस लावून पळवून नेत तीन महिने अत्याचार केला होता. तर या प्रकरणात अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याने मदत केली होती. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिसात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी या तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात हा खटला चालला. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. यात पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. ॲड. बोरसे यांचा प्रभावी युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले पुरावे लक्षात घेता न्यायालयाने लखन याला सहा कलमांमध्ये दोषी ठरवले. तर अतुल याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.