जळगाव (प्रतिनिधी) वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये समावेश करून नफ्याचे अमिष दाखवत भुसावळ येथील एका व्यापाऱ्याची ३४ लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दि. १ जानेवारी ते दि. १३ डिसेंबरपर्यंत घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील व्यापाऱ्याला दि. १ जानेवारी रोजी एका ग्रुपच्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर दोन महिलांनी त्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले व त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितली. त्यातून अधिक नफा देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या
बँक खात्यात वेळोवेळी एकूण ३४ लाख रुपये ऑनलाईन स्वीकारले. या व्यापाऱ्याने वेळोवेळी रक्कम गुंतविल्यानंतर अनेक दिवस होऊनही त्यांना कोणताही नफा मिळाला नाही. अनेक दिवस मुद्दलही परत मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.
 
	    	
 
















