जळगाव (प्रतिनिधी) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी साजरा होणाऱ्या पत्रकारदिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावानेच असलेल्या पत्रकार सन्मान योजनेत न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी जळगावातील ज्येष्ठ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ आली. दिवसभरात अनेकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. तर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
राज्य शासनाकडून ज्येष्ठ पत्रकारांना मिळणाऱ्या अधिस्वीकृती व दरमहा पेन्शन योजना पासून विविध त्रुटी दाखवून ज्येष्ठ पत्रकारांची अडवणूक करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ आज जळगाव ज्येष्ठ पत्रकारांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात शासनाचा व विविध त्रुटी दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. उपोषणाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या उपोषणात जिल्हाध्यक्ष शिवलाल बारी, कार्याध्यक्ष अरुण मोरे, सचिव केदारनाथ दायमा, मोहन साळवी अशोक जैन, सुभाष पाटील, अनिल मुजुमदार, प्रकाश पत्की यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकार सहभागी झाले होते. तर मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष विजय पाटील, दिलीप शिरोळे जमनादास भाटिया, दिनेश दगडकर, गुलाम अहमद देशमुख, शब्बीर सय्यद, उमाकांत वाणी, फारुक शेख, पांडुरंग महाले, ताराचंद पुरोहित यांनी उपोषणाला भेट देऊ काही वेळ सहभाग नोंदविला. त्याचबरोबर शिवराम पाटील, जगन्नाथ पाटील, मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, प्रा. आशिष जाधव, बळीराम गायकवाड, आमदार राजुमामा भोळे यांचे प्रतिनिधी शाम भावसार व अनेक प्रतिष्ठित यांनी उपोषणाला पाठिंबा दिला. दुपारी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.