जळगाव (प्रतिनिधी) विधान परिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे आणि भाजप नेते राम शिंदे हे दोघं प्रतिस्पर्धी एकमेकांना भेटल्याने चर्चेला उधाण आले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. या सर्व आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना पक्षश्रेष्ठींकडून अनेक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दरम्यान आज संध्याकाळी ट्रायडेंट हॉटेल परिसरात एक अनपेक्षित राजकीय घडामोड घडताना दिसली. भाजपचे नेते राम शिंदे आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. खडसे आणि शिंदे यांच्या भेटीचे फोटो आता समोर आले आहेत. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत.
राम शिंदेंवर भाजपची मोठी जबाबदारी
भाजपने आगामी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या रणनीतीचाच एक भाग म्हणून माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांना पुण्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना प्रभारी म्हणून नेमण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून गेल्या तीन टर्मपासून शरद पवार यांच्या मुलगी सुप्रिया सुळे निवडून येत आहेत. भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत चांगलीच ताकद लावली होती. त्यावेळी भाजपचा अवघ्या 70 ते 75 हजारांच्या फरकावर पराभव झाला होता. त्यामुळे भाजपच्या आशा बळावल्या आहेत. यावेळी भाजप बारामती मतदारसंघात बाजी मारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी राम शिंदे यांना बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे.