जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेचे सत्ता वाटपाचे सूत्र कसे असणार आहे?, याबाबत आज ‘मविआ’ बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी सविस्तर माहिती दिली.
जिल्हा बँकेची निवडणुकीत राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला ७, कॉंग्रेसला ३ तर भाजपला एक जागा मिळाली आहे. निकालानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. यात एकनाथराव खडसे यांना अध्यक्ष निवडीचे अधिकार देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिली होती.
आजच्या बैठकीनंतर मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, पहिले तीन वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपद तर नंतरची दोन वर्षे शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार आहे. तसेच पहिले दोन वर्ष कॉंग्रेसला, नंतरची दोन वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार हे एकनाथराव खडसे ठरविणार असून शिवसेनेच्या उपाध्यक्षपदाचे उमेदवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार शिरीष चौधरी, आामदार किशोरआप्पा पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संचालक प्रतापराव हरी पाटील यांची उपस्थिती होती.