जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीकोनातून अनेक कार्य प्रगतीपथावर सुरू आहेत. पण, महाराष्ट्रातील असे काही भाग आहेत जिथे ट्रेन तर सोडाच साधी बससेवा देखील उपलब्ध नाही. अशाच एका गावात स्वातंत्र्यानंतर एसटी महामंडळाची बस स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या पहिल्यांदाच पोहोचली. हे गाव आहे जळगाव तालुक्यातील निमगाव. गावात बस दाखल होताच माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील यांनी बसचे नारळ फोडून स्वागत केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील एका कुटुंबाच्या सांत्वनासाठी निमगाव गावात आले होते. यावेळी माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील यांनी प्रतापराव पाटील यांच्याकडे गावात बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची होणारी पायपीट होत असल्याचे सांगितले होते. प्रतापराव पाटील यांनी लागलीच ना. गुलाबराव पाटील यांना गावातील समस्या सांगितली. आणि गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अखेर निमगावात स्वातंत्र्यानंतर बस दाखल झाली. पहिल्यांदा बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होत गुलाबराव पाटील यांचे आभार मानले होते.
ना. गुलाबराव पाटील यांनी गावात आधी रस्ते नव्हते त्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि गावात रस्ते तयार झाले. त्यानंतर त्यांच्याकडे बस सेवेची समस्या मांडण्यात आली याची देखील त्यांनी दखल घेऊन तात्काळ व सेवा चालू केली. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे गावात बस आली आणि ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. रस्ता डांबरीकरण करण्यासह गावाला बस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने युवराज पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच 75 वर्षानंतर निमगाव गावात प्रथम बस सेवा सुरू झाली आणि ही बस सेवा सुरळीत सुरू असून गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना याचा आनंद असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले.
यावेळी गावातील माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य युवराज घनश्याम पाटील, सोपान तुकाराम पाटील, युवराज यादव धनगर, कविता हेमराज पाटील, मुकेश निळकंठ पाटील, आशा विनोद पाटील, भूषण आनंदा पाटील, कृष्णा डालू पाटील, प्रवीण अर्जुन पाटील, आत्माराम शिरोळे तसेच एसटीचे वाहन चालक, कंडक्टर हे उपस्थिती होते.