नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारला लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या वादावादीनंतर हाणामारीत झालेल्या पैलवानाच्या मृत्यू प्रकरणी सुशील कुमारचा पोलीस शोध घेत आहेत.
मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यावरुन पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्ली एनसीआरसोबतच शेजारी राज्यांमध्येही छापेमारी करुन सुशील कुमारचा शोध घेतला जात आहे.
मयत पैलवान सागर राणा हा आपल्या मित्रांसोबत छत्रसाल स्टेडियमजवळील मॉडेल टाऊन परिसरातील एका घरात राहत होता. ही जागा रिकामी करण्यावरुन गेल्या मंगळवारी (४ मे) मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि गोळीबारही झाल्याचा आरोप आहे. यावेळी सुशील कुमारही उपस्थित असल्याचा दावा पीडितांनी केला आहे. जखमी पैलवानांपैकी सागर राणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर काही जण जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्कॉर्पिओ कार आणि बंदूक मिळाली आहे. त्यासोबतच पोलिसांनी जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत. याआधीही पैलवानांच्या गटात प्रॉपर्टीवरुन वाद झाल्याची माहिती आहे.
कोण आहे सुशील कुमार?
सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अॅथलीट आहे. ३७ वर्षीय सुशील कुमारने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. २००८ मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं. त्याला २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.