जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेविरुद्ध दोषारोप पत्र काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले आहे. या दोषारोप पत्रातून ठेवी कर्जामध्ये वर्ग केल्यामुळे तब्बल १२१ कोटी २३ लाख ४४१ रुपयांचा एकूण तोटा झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापुर या तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. यातील डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेविरुद्ध दोषारोप पत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार प्रेम रामनारायण कोगटा, जयश्री अंतिम तोतला, अंबादास आबाजी मानकापे, भागवत गणपत भंगाळे, छगन शामराव झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, असिफ मुन्ना तेली, जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला, राजेश शांतीलाल लोढा, प्रितेश चंपालाल जैन, चंदूलाल विश्रामभाई पटेल, धरम किशोर साकला व याची आई सुनंदा किशोर साकला यांनी व इतर कर्जदारांनी ठेवीदारांच्या ठेवी वर्ग करून कर्जाच्या स्वरुपात घेतलेला ठेवीदारांच्या रकमेचा अपहार केला. त्यामुळे झालेला तोटा खालीलप्रमाणे.
पाच जणांवर दोषारोपपत्रात ‘हा’ ठेवला होता ठपका
पुणे न्यायालयात फेब्रुवारी महिन्यात पाच संशयितांविरुद्ध २४०० पानांचे पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांची फसवणूक, अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यात सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी व सुजित वाणी या पाच जणांविरुद्ध दोषारोप सादर ठेवण्यात आले होते.
सुरज झंवरच्या विरोधातही दोषारोप पत्र आहे दाखल
मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर यांच्या विरोधातही एप्रिल महिन्यात पुणे विशेष न्यायालयात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने दुसरे दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार सुनील झंवर यांची साई मार्केटींग ऍण्ड ट्रेडींग नावाने कंपनी आहे. या कंपनीत सूरज झंवर हा संचालक असून तो कंपनीचा भागीदार आहे. या कंपनीच्या नावाने निविदा भरुन बीएचआरच्या कोट्यवधींच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते.
विजय वाघमारे (9284058683)