जळगाव (प्रतिनिधी) पुण्याला मुलाकडे गेलेल्या अरुण लक्ष्मण शेटे (वय ६४, रा. मुकुंद नगर, लाठी शाळेच्या मागे) यांच्या घराचा दरवाजा आणि खिडकीच्या आसारी वाकवून घरात ठेवलेले महादेवाच्या मंदिरातील पींडीवरील चांदीचे मुकूट, इतर देवांची मुर्ती व चांदीचे साहित्य असा एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांचा एमआयडीसी पोलिसांनी ४८ तासात मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्गत करण्यात आला आहे.
शहरातील मुकुंद नगरातील अरुण शेटे हे दि. २७ जून रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. दि. ११ रोजी ते पुण्याहून जळगावला येण्यासाठी निघाले असता, त्यांना शेजाऱ्यांनी तुमच्या घराचा दरवाजा आणि खिडकीच्या आसारी वाकलेल्या असल्याचे सांगितले. त्यावेळी शेटे हे घरी आले असता, त्यांना घरातील फर्निचरच्या कपाटात ठेवलेले चांदीचे मुकुट आणि देवघरातील चांदीचे देव असा एकूण ६१ हजारांचा ऐवज चोरी झाल्याचे समजले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, राहुल घेटे यांचे पथक तयार केले.
सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयित जेरबंद
या पथकाने तपासचक्रे फिरवित त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यामध्ये काही संशयित कैद झाल्याने पथकाने संशयित शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४, रा. कासमवाडी) व राहुल शेख रावळकर (वय ३२, रा. जाखनीनगर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
चोरलेला मुद्देमाल केला हस्तगत
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून महादेवाच्या पिंडीवरील चांदीचे मुकुट आणि इतर चांदीचे साहित्य जप्त करण्यात आले.