धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ 30 जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास लोखंडी रॉडने जबर मारहाण करून दोघांना लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुरेंद्र जगन्नाथ यादव (रा.जळगाव)आणि लक्ष्मण शिंदे हे दोघं मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पिंप्री येथील मित्राला सोडून जळगावला आपल्या कारने जात होते. यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला. गाडीतील सामान चोरीला जाऊ नये म्हणून दोघांनी मुसळी फाट्याजवळ कार लावून कारमध्येच झोपण्याचा निर्णय घेतला.
मध्यरात्री दीड-दोन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे आले. त्यांनी दोघांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तसेच यादव यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, रेडमीचे मोबाईल, लॅपटॉप आदी ऐवज जबरीने लुटून पळ काढला.
या प्रकरणी धरणगाव पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहे.