मुंबई (वृत्तसंस्था) ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकार योगेश सोहोनी याला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे येथील शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
योगेश सोहोनी हा ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील शौनक जहागीरदार या पात्राची भूमिका साकारत आहे. ३२ वर्षीय योगेश सोहोनी मुंबईतील अंधेरी भागात राहतो. तो शनिवारी सकाळी आपल्या कारने मुंबईहून पुण्याला निघाला होता. सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास उर्से टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमाटणे एक्झिटजवळ पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ मागून आली. स्कॉर्पिओ चालकाने योगेशला हात दाखवून थांबण्यास सांगितले. त्यामुळे त्याच्या ड्रायव्हरने कार थांबवली. ‘तुझ्या कारमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यात एक जण जखमी झाला आहे. अपघाताची तक्रार पोलिसात द्यायची नसेल, तर तू मला सव्वा लाख रुपये दे, नाही तर मी तुझ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करेन’ असं स्कॉर्पिओ चालकाने योगेश सोहनीला धमकावलं.
स्कॉर्पिओ चालकाने योगेशला सोमाटणे फाट्याजवळ एका एटीएममधून जबरदस्ती ५० हजार रुपये काढण्यास भाग पाडलं. ती रक्कम घेऊन स्कॉर्पिओ चालक पसार झाला. योगेशला संशय आल्याने त्याने चौकशी केली, तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कोणताही अपघात झाला नसल्याचं त्याला समजलं. योगेश सोहनीने सोमवारी पोलिसात जबरी चोरी आणि लुटमारीची तक्रार दाखल केली आहे. एक्सप्रेस वेवर असलेल्या सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.