शिर्डी प्रतिनिधी । अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी जरा हळू चालवा, असं सांगितल्याचा राग येऊन ग्रामपंचायतीच्या शिपाईला बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचा शिपाई रामदास बांडे (वय-40, रा. खडकी, ता. अकोले) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजूर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खडकी बुद्रुक गावातून तक्रारदार रामदास बांडे हे पायी चालत असताना आमदार किरण लहामटे यांच्या गाडीने त्यांना कट मारला. त्यावर रामदास बांडे यांनी ओरडून गाडी हळू चालवा, असं म्हटलं. याचा राग आल्यानंतर आमदार किरण लहामटे यांनी आपली गाडी थांबवली. ते गाडीच्या खाली उतरले आणि छाती, पोटावर लाथ मारली. मला ओळखतो का? असं म्हणून शिवीगाळ केली, नंतर गाडीत बसून निघून गेले, असं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेवरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झाला आहे. अकोले भाजपच्या वतीने घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. एका सामान्य माणसाला तालुक्याचे लोकप्रतिनिधी अंगावर हात टाकत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे, असं अकोले भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी म्हटलं आहे.