जळगाव (सुरेश उज्जैनवाल) राजकारणातील उलथपालथी महाराष्ट्राला नवीन नाही, पण एकूणच राजकीय क्षेत्रात जो गोंधळ सुरू आहे,तो मात्र नवीन आहे. सर्व सामान्य जनता मुक दर्शक म्हणून या गोंधळाकडे पाहत आहेत. ही गोंधळाची स्थिती किती काळ राहील, हे सांगणे ही अवघड आहे. अशा या अनिश्चिततेच्या वातावरणात शरद पवार यांची राजकीय सभा धूम धडाक्यात संपन्न झाली आहे.
जळगावात गेल्या मंगळवारी (५ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा पार पडली. साधारणपणे दोन महिन्या पूर्वी (२७ जून ) शासनकर्त्या पक्षांची जाहीर सभा “शासन आपल्या दारी” या अभियनांतर्गत झाली. शासन अभियानांतर्गत सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी शासकीय यंत्रणेला टार्गेट दिले गेले, वाहनांची बडदास्त ठेवली गेली. काही सक्तीचे फर्मान ही काढले गेले. तरी देखील अपेक्षित गर्दी जमविण्यात पाहिजे तसे यश लाभले नाही. ‘शासन आपल्या दारी’ या सभेचा नेमका परिणाम लाभार्थी अथवा श्रोत्यांवर किती व कसा झाला?, हे आयोजकच सांगू शकतील. पण बिगर सत्ताधारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जळगावच्या सागर पार्क येथे घेतलेल्या ‘स्वाभिमान सभा’ आणि सभेतील उपस्थितीने ज्येष्ठ नेते शरद पवारांची जनमानसातील प्रतिमा किती खोलवर आहे, हे अधोरेखित केले आहे.
सत्ता नसतांनाही लोक हजारोच्या संख्येने श्री.पवार यांना बघण्या, ऐकण्यासाठी येवू शकतात, हे फक्त पवारांबाबतीतच घडू शकते. गेल्या काही वर्षांपासून राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल कमालीचा बदल अनुभवास येतोय. सत्ता विना नेता म्हणून गणला जात नाही ‘भलेही एखादा नेता म्हणत असेल की, ‘मी पुन्हा येईन’ !
राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेने सभेत शेतकरी, सर्व सामान्य श्रोते म्हणून आलेल्यांचा स्वाभिमान जागृत केला किंवा नाही हे सांगता येणार नाही, पण शरद पवार यांचे नेतृत्व मानणाऱ्या कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा स्वाभिमान निश्चित उंचावला असावा. सभेतील श्री.पवार यांचे भाषण उद्याच्या निर्णय प्रक्रियेत मतदारांना जागृत करण्यासाठी साधलेला संवाद ठरावा.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बहुतेक किंबहुना सर्वच पवारांचे पूर्वाश्रमीचे सहकारी अथवा त्यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवणारे आहेत. मात्र दोन वर्षांपूर्वी पवारांचं नेतृत्व स्वीकारत पक्षात आलेले जिल्ह्याचे मास लीडर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची राजकीय शक्ती ही राष्ट्रवादी पक्षासाठी बळ वाढविणारी आहे.
पवारांच्या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, एकनाथराव खडसे यांची भाषणे लक्षवेधी होती. या सभेचं आणखी वैशिष्ठ्य म्हणजे आमदार रोहित पवार यांनी व्यासपिठावरून खाली येवून जनतेत बसले, तर पक्षाच्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी दाखविलेला उत्साह आणि केलेले शक्ती प्रदर्शन, हे त्यांच्या नेतृत्व गुणाची चुणूक म्हणता येईल.
लोकशाही प्रक्रियेत जनमत तयार करण्याचे काम राजकीय सभा करतात. अशा सभा लोक जागृतीचे महत्वाचे साधन असून जाहीरपणे होणाऱ्या सभा लोकशाहीसाठी पोषकच आहे. परंतु अलीकडच्या काळात राजकीय प्रक्रियेत त्या केवळ “शक्तिप्रदर्शना” पुरत्या उरल्याचे चित्र आहे. तथापि राष्ट्रवादीच्या सभा जनमत तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग ठरेल का?, हे मात्र, आगामी काळातील निवडणुकीचे निकालच ठरवतील !
– सुरेश उज्जैनवाल, (ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया, जळगाव)