धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जनावरांना चिपी रोगाची लागण झाल्याने अनेक बैल, गायी, म्हैस दगावल्या आहेत. आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात असताना या रोगामुळे जनावरांचा मृत्यू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, चिपी रोग लसीकरण सुरु करावे अन्यथा शेतकरी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनेकांनी दिला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव येथील पुंडलिक माणिक मराठे यांनी नवीन बैल जोडी घेतली होती. त्यातील एक बैल चिपी रोगामुळे दगावल्याने त्यांचे ५० हजाराचे नुकसान झाले. या चिपी रोगाच्या फैलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच पशुसंवर्धन विभागात लस उपलब्ध नसून एकच पशुवैद्यकीय डॉक्टर व शिपाई असून ते उपस्थित राहत नाहीत, अशी तक्रार शेतकरी करताय. शासनाने कर्मचारी वाढवून चिपी रोग लसीकरण सुरु करावे, अशी मागणीही होत आहे. दरम्यान, शासनाने लक्ष घालून लसीकरण सुरु करावे, शेतकऱ्यांना जे आर्थिक नुकसान होत आहे त्यापासुन वाचवावे, अशी मागणी राहुल शालीक पवार, लोटन भाष्कर मराठे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
लसीकरण सुरु करा अन्यथा शेतकरी आंदोलन
जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून धरणगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी वाढवून लसीकरण सुरु करावे अन्यथा शेतकरी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका संगीता मराठे यांनी दिला आहे.