जळगाव (प्रतिनिधी) येथील एमआयडीसीत बंद कंपन्यांमधून तांब्याची तार व मशीनचे स्पेअर पार्ट चोरी करणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून इमरान खान भीस्ती असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या चोरट्याकडून सुमारे 50 हजार रुपये किमतीचे चोरी केलेले तांब्याचे तार, मशीनचे स्पेअर पार्ट व मालवाहू रिक्षा असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याकडून अजूनही काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडते आणण्यात पथकाला यश मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, “दिनांक 13 जुलै 2025 रोजी एमआयडीसी परिसरातील बंद असलेल्या व्ही सेक्टरमधील V-15 कंपनीतून तांब्याच्या तारेचे वायरचे रिल (18000 रुपये किमतीचे), पॉलीकेब पॅकिंग असलेले इलेक्ट्रिक वायरचे 7 बंडल (5600 रुपये किमतीचे), तर V-130 गौरी पॉलीमर्स या बंद कंपनीतून चटई बनविण्याच्या मशिनचे नवे-जुने स्पेअर पार्ट (25000 रुपये किमतीचे), असा एकूण 48 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.”
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक कार्यरत झाले. पोउनि राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील तसेच नेत्रम योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात दोन अज्ञात महिला व एक पुरुष व्ही सेक्टरमधील बंद कंपनीत चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसून आले. चोरीचा माल गोण्यांत भरून रिक्षामार्फत नेत असल्याचेही दिसून आले.
तपास पुढे रेटून रिक्षाचा क्रमांक आणि सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित पुरुषाची ओळख पटवली. पोलिसांनी शाहूनगर, जळगाव येथील इमरान खान सलीम खान भीस्ती उर्फ रेपट्या याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल व माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शन लाभले. नेत्रम शाखेचे पोकॉ पंकज खडसे व पोकॉ मुबारक देशमुख यांनी देखील कारवाईत मोलाचे सहकार्य केले. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील व पोकॉ नरेंद्र मोरे करीत आहेत.