चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या ५० वर्षात गिरणा व मन्याड धरणानंतर गिरणा नदीवरील वरखेडे धरण केवळ मोदी सरकारमुळे पूर्ण होऊ शकले, असे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले. ते सायगाव उंबरखेड गटाचा मांदुर्णे येथील भाजपा महायुतीचा भव्य मेळावा बोलत होते.
सायगाव उंबरखेड गटाचा भाजपा महायुतीचा भव्य मेळावा शुक्रवारी मांदुर्णे येथे संपन्न झाला. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण पुढे म्हणाले की, ही निवडणूक देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. आता त्यांनी ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प केला आहे. गेल्या १० वर्षात देशात रस्ते, रेल्वे, तंत्रज्ञान या क्षेत्रात झालेले बदल आपल्याला दिसत आहे. गेल्या ५० वर्षात आपल्या गिरणा खोऱ्यात गिरणा मोठे धरण व मन्याड प्रकल्प हे दोनच प्रकल्प होते. मात्र २० वर्षांपासून मंजूर असलेला गिरणा नदीवरील वरखेडे धरण सारखा प्रकल्प केवळ मोदीजींच्या सरकारने बळीराजा जलसंजीवणी योजनेतून एकरकमी निधी दिला म्हणून पूर्ण होऊ शकला.
पुढील काही महिन्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेले वरखेडे धरण बंदिस्त पाईपलाईन काम, गिरणा डावा व मन्याड उजवा कालवा पाटचाऱ्या काँक्रीटीकरण काम पूर्ण करून तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न असल्याचेही आमदार चव्हाण म्हणाले. अयोध्येत राम मंदिर उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले. आपली राम सेना आहे तर दुसरीकडे त्यांची रावण सेना आहे. इंडी आघाडी वाले दहा तोंडी रावण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पराभव करण्यासाठी टपून बसले आहेत. त्यामुळे रामाला तंबूतून मंदिरात विराजमान करणाऱ्याला आपल्याला विजयी करायचे आहे, असे आवाहन देखील आमदार चव्हाण यांनी यावेळी केली.
यावेळी गटातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना भरघोस मताधिक्य देण्याचा संकल्प सर्वांनी केला. यावेळी भाजपा, शिवसेना, रिपाई, मनसे, एकलव्य संघटना आदी मित्र पक्षांचे पदाधिकारी, आजीमाजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.