जळगाव (प्रतिनिधी) मुद्रांक शुल्कामध्ये केलेल्या वाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमीन देशपांडे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या ऐवजी ५०० रुपयाचे शुल्क लागू करण्यात आले आहे. यामुळे सामान्य जनतेवर अनावश्यक आर्थिक भार पडत असून, हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हिताविरुद्ध आहे. सर्वसाधारण नागरिकांची क्रयशक्ती मर्यादित असते, आणि मुद्रांक शुल्कामध्ये झालेल्या या अचानक वाढीमुळे त्यांना विविध कायदेशीर आणि आर्थिक व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शेतकरी, लहान व्यवसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हा निर्णय पुनर्विचारात घेऊन ५०० रुपयांच्या मुद्रांक शुल्काची सक्ती मागे घ्यावी आणि पूर्वीप्रमाणे १०० रुपयांचे मुद्रांक शुल्क कायम ठेवावे.