रावेर (प्रतिनिधी) येथील एका लॉजमध्ये दोन अतिरेकी पोलिसांनी पकडल्याची अफवा पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तथापि, रावेर पोलिसांनी दोन संशयितांना पकडून त्यांची चौकशी केली असता, दोघ गुजरात येथील कृषी विज्ञानातील संशोधक डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून सुटका करण्यात आली.
रावेर शहरातील स्टेशन रोडलगतच्या सुसज लॉजवर संशयित व्यक्ती थांबून असल्याची माहिती प्राप्त झाली. तेव्हा पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विशाल सोनवणे, पो.ना. सुनील वंजारी, पो. कॉ. सुकेश तडवी, पो. कॉ सचिन घुगे, श्रीराम कांगणे आदींचे पथक साध्या गणवेशात लॉजमध्ये धडकले, त्यांनी पोलिसांची ओळख पटवण्याबाबत आरडाओरडा करून धावपळ केली. तसेच पोलीस वाहन पाहून व लॉजमध्ये अतिरेकी पकडल्याची तथा एका बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी पकडण्याच्या वेगवेगळ्या अफवा शहरात कानोकानी काही क्षणात पसरल्या. यामुळे एका कापड मॉल परिसरापासून ते पोलिस ठाण्यासमोर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
पोलिसांनी दोन्ही संशयितांना व त्यांचे चार चाकी वाहन पोलीस ठाण्यात नेऊन पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या सक्षम चौकशी करून व झाडाझडती घेतली. तेव्हा गुजरातमधील कृषी विज्ञान संशोधनात डॉक्टर पदवी संपादित केलेले दोन्ही जण कृषी प्रकल्पावर संशोधन करण्यासाठी फिरस्तीवर असल्याची बाब उघड झाली. मात्र त्यांनी सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले.