धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची ०९ डिसेंबर २०२४ रोजी निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात धक्का दिला आहे. या खून प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय सरपंच परिषद (महा. राज्य) च्या वतीने सरपंचांच्या संरक्षणाची मागणी धरणगाव तहसीलदार रावसाहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मस्साजोग ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच, संतोष देशमुख यांचा खून ०९ डिसेंबर २०२४ रोजी निघृणपणे करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. घटनेच्या तपासासाठी महाराष्ट्र शासनाने एसआयटी स्थापन केली असून, संबंधित आरोपींची शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आले आहेत.
सरपंचांच्या संरक्षणाची मागणी
महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे आणि मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच, सरपंच हत्याकांडासंबंधी गंभीर दखल घेत राज्यातील सर्व सरपंचांना पत्रकारांप्रमाणे सरपंच संरक्षण कायदा लागू करावा. याशिवाय, सरपंच पदावर असताना अपघात झाल्यास विमा संरक्षण उपलब्ध करून देणारे विधेयक विधानसभेत मांडून मंजूर करावे, जेणेकरून भविष्यात असे घटनादुरवर्तन पुन्हा होणार नाही. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून ५० लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात यावी, अशी मागणी धरणगाव तालुक्यातील सरपंचांच्या वतीने अखिल भारतीय सरपंच परिषद (महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार रावसाहेब यांना निवेदन दिले आहे.