मुंबई (वृत्तसंस्था) पोक्सो विशेष न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मुलीला एकदा ‘आय लव्ह यू’ म्हणणं (Saying I Love You) हा तिचा हेतुपरस्सर विनयभंग होत नाही. तर तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची ती भावना असते, असं न्यायालयानं म्हटलं आहे. असा निकाल देत पोक्सो विशेष न्यायालयाने २३ वर्षीय संशयित आरोपी तरुणाची निर्दोष सुटका केली आहे.
२०१६ साली आरोपी तरुणाने एका १७ वर्षीय मुलीला ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं होतं. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कळाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी पीडित मुलीकडे एकटक पाहत होता. तसेच त्याने पीडितेकडे पाहून डोळे मिचकावले होते. शिवाय त्याने पीडितेच्या आईला धमकीही दिली होती, असे विविध आरोप संबंधित तरुणावर करण्यात आले होते.
हा विनयभंग ठरू शकत नाही
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पोक्सो विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. पण डोळे मिचकावल्याचे अथवा धमकी दिल्याबाबत कोणतेही सबळ पुरावे फिर्यादी पक्षाकडून न्यायालयात सादर केले नाहीत. याचाच आधार घेत न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष सुटका केली आहे. यावेळी न्यायालयाने म्हटलं की आरोपी तरुणाने एकदाच पीडित मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं. त्यानं ही गोष्ट वारंवार केली नाही. त्यामुळे हा विनयभंग ठरू शकत नाही. संबंधित तरुणाचं मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यानं हे उद्गार काढल्याचं स्पष्ट होतं.
तरुणाची निर्दोष सुटका
पोक्सो न्यायालयाने पुढं म्हटलं की, आरोपी तरुणानं लैंगिक हेतू लक्षात घेऊन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा किंवा मुलीच्या आईला धमकी दिल्याचा कोणताही सबळ पुरावा फिर्यादी पक्षाला न्यायालयासमोर सादर करता आला नाही. त्यामुळे एकंदरीत स्थिती लक्षात घेता आरोपी तरुणाची निर्दोष सुटका करण्यात येत आहे.