
धरणगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शाळा सुटल्यानंतर बस पकडताना एका विद्यार्थिनीचा पाय घसरून ती बसखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. राजनंदिनी शिंदे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पाळधी येथील झंवर विद्यालयात शिक्षण घेत होती.
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आपापल्या गावाकडे जाण्यासाठी पाळधी बस स्थानकात मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत बसमध्ये चढत असताना राजनंदिनी शिंदे हिचा पाय घसरला आणि ती बसखाली आली. या दुर्घटनेत तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.
दरम्यान, पाळधी बस स्थानकात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी बस स्थानकात विद्यार्थ्यांच्या गर्दीचे नियोजन तसेच सुरक्षित बससेवेची व्यवस्था करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.















