सातारा (वृत्तसंस्था) शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना माण तालुक्यातील आंधळी येथील पवारदरा या ठिकाणी मध्यरात्री घडली आहे. संजय रामचंद्र पवार (वय ५०), मनीषा संजय पवार (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी बाबुराव शहाजी पवार या चुलतभावाला अटक करण्यात आली आहे.
संजय पवार व मनीषा पवार हे दोघे रात्री दहानंतर पवारदरा येथील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाइप जोडत असताना घरगुती वादाचा राग मनात धरून चुलतभाऊ बाबुराव पवार याने धारदार शस्त्राने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये डोक्यात आणि मानेवर बसलेला जबरी घावामुळे दोघेही जागीच गतप्राण झाले.
सकाळी ९:३० वाजता या परिसरातील शेतकरी शेतात जात असताना त्यांना दोन मृतदेह आढळून आले. याची माहिती पोलिसांना कळल्यानंतर दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पंचनामा केला. दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी चार तासांत आरोपीला अटक केली. या निर्घृण हत्येमागचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.