जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे परंतु दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे गेल्या महिन्या भरात उरण आणि शिळफाटा येथे महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खुन करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून गृहखात्याच्या इभ्रत वेशीवर टांगली गेली आहे. महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आणि घटनांमधील आरोपींना फाशीशी शिक्षा मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बुधवार दि ३१ जुलै २०२४ रोजी राज्यभरात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे आली. या योजने अंतर्गत राज्यातील पात्र माता भगिनींना दरमहा १५०० रूपये देण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई वाढलेले गॅस सिलेंडरचे दर यामुळे महिलांना घर खर्च भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे आता सरकार महिलांना दरमहा १५०० रुपये देणार आहे त्यामुळे महिलांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे परंतु एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दर्शवनाऱ्या आहेत.
यात नवी मुंबईतील उरण येथील एका बावीस वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे. तर दुसऱ्या घटनेत बेलापूर येथील तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून डायघरजवळील शीळ फाटा येथील गणेश घोळ मंदिरात गेली होती. येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी या पीडितेला चहातून गुंगीचे औषध देऊन या पीडितेवर आळीपाळीने बलात्कार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या दोन्ही घटना अत्यंत अमानवीय आणि निर्दयी आहे.
या घटनांमुळे राज्याचे गृह खाते निद्रिस्त असुन राज्यात महिला असुरक्षित असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. या दोन्ही घटना क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या असुन निषेधार्ह आहेत या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी व घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील विकृत मानसिकतेच्या पाषाणहृदयी आरोपींना लवकरात लवकर फाशीशी शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे बुधवार ३१ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वा राज्यभरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रोहिणीताई खडसे यांनी दिली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्या महिला भगिनी समवेत समाजातील सर्व महिला भगिनींनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन रोहिणीताई खडसे यांनी केले आहे.