धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपासून त्यांना त्रास सुरु होत होता. त्यानंतर आराधना हॉस्पिटलमध्ये ते उपचारार्थ दाखल झाले आहेत. आता त्यांची प्रकृतीस्थिर असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना विरूध्दच्या लढ्यात गुलाबराव वाघ यांनी मोठे योगदान दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा सातत्याने संपर्क सुरू होता. गेल्या वर्षभरात तर त्यांनी प्रत्यक्ष रूग्णसेवेला प्राधान्य दिले होते. त्यांच्या पत्नी, माजी, नगराध्यक्षा उषाताई वाघ, आई आणि मुलगा सुध्दा गेल्या वर्षी पॉझिटीव्ह आले होते. मात्र, न डगमगता गुलाबराव वाघ यांचा जनसंपर्क सुरूच होता. पालिकेच्या कामकाजासह जिल्ह्यातील शिवसैनिकांची त्यांनी या काळात प्रचंड काळजी घेतली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांना त्रास जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी सोमवारी आपला स्वॅब दिला आणि रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यानंतर त्यांनी विलंब न करता येथील आराधना हॉस्पिटलमध्ये स्वत:ला उपचारार्थ दाखल करून घेतले आहे. सर्वांच्या सद्भावना आणि न आर्शिवादाने आपण लवकरच पुन्हा सार्वजनिक जिवन आणि जनतेच्या सेवेत सक्रीय होईल असा विश्वास गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केला आहे.