धरणगाव (प्रतिनिधी) एकीकडे राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असताना दुसरीकडे धरणगाव पालिका प्रशासनाला मात्र, या दिनाचा विसर पडल्याचे चित्र दिसून आले. यामुळे तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा आज चक्क धरणगाव पालिका प्रशासनाला विसर पडला. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन असूनही आज पालिका प्रशासनाच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता काय साधे माल्यार्पण देखील केले नाही.
वास्तविक बघता पालिका प्रशासनाकडून पुतळ्याच्या परिसराची साफसफाई होणे. तसेच सुशोभिकरण करणे गरजेचे होते. एवढेच नव्हे तर, आता धरणगाव पालिकेवर प्रशासक लागू झाली असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज नव्हती का?, असा संतप्त सवाल देखील शिवप्रेमींमधून उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, आजच्या दिनाचे महत्त्व माहित असून देखील पालिका प्रशासनाने कुठलीही खबरदारी घेतली नाही. यामुळे राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, दीपक वाघमारे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा पालिका प्रशासनाला विसर पडतो ही अत्यंत खेदाची बाब असून पालिका प्रशासनाला याचे उत्तर द्यावेच लागेल. या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन आणि दिपक वाघमारे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे मोहन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुसरीकडे मराठा समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गुलाब मराठे यांनी देखील पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. दरवर्षी पालिका प्रशासनाला महापुरूषांच्या दिनाचे महत्त्व सांगावे लागते, ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटले. आज देखील फोन केल्यानंतर सायंकाळी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. पालिका प्रशासन मुद्दाम झोपेचे सोंग घेते का?, अशी शंका आता आम्हाला यायला लागली आहे. यापुढे महाराजांचा असा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा सक्त इशारा देत गुलाब मराठे यांनी आजच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.