जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाने ५० वर्षाच्या आतील वयाच्या किमान २०,००० महिला महाराष्ट्रात विधवा झाल्या आहेत. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्रातील सामाजिक संस्था एकत्र येत आहेत. जळगाव जिल्ह्यातही अशा अनेक महिला असल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी मराठी प्रतिष्ठाण प्रयत्न करत आहे. निस्वार्थी हेतूने सामाजिक काम करण्याची आवड असणाऱ्या संस्था व व्यक्तींनी या प्रयत्नात सामील व्हावे, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पत्र घेऊन भेटणे, चर्चा करणे, महिला बालविकास च्या मदतीने त्यांना सर्व्हे करायला लावणे, शासनाच्या वेगवेगळ्या योजना येतील त्याची या महिलांसाठी अंमलबजावणी करणे, महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने प्रयत्न करणे, महिलांच्या मुलांसाठी बालसंगोपन योजना राबविणे व या कुटुंबांना आधार देणे इतकेच हे काम आहे. जिल्ह्यातील संख्याही फार मोठी नाही. त्यामध्ये एक वर्षभर या कुटुंबासाठी जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.
आम्ही यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अशा कामात आवड असणाऱ्या निस्वार्थी व्यक्ती व संस्थाचा समूह करत आहोत.आपल्यालाही सहभागी व्हायचे असेल तर मराठी प्रतिष्ठाण च्या जळगाव कार्यालयात संपर्क साधावा अशी विनंती मराठी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे अध्यक्ष-मराठी प्रतिष्ठाण यांनी केली आहे.
















