
जळगाव (प्रतिनिधी) – गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या ओम रविंद्र सोनवणे (वय २०, रा. कलाभवन नेहते कॉम्पलेक्स) या तरुणासह त्याच्या भावाला मारहाण केली. तसेच त्यांच्यावर दगडफेक करीत जखमी केले. ही घटना दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता सबजेल मागील बाजूस असलेल्या गणेश नगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी कॉलनी रोडवरील कलाभवनजवळ ओम सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी तो त्याचा भाऊ शुभम सोनवणे याच्यासोबत सबजेलच्या पाठीमागे राहणाऱ्या त्याच्या आत्याकडे जेवणासाठी गेला होता. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तो जेवण करुन घरी जात असतांना त्याच्या ओळखीच्या विक्की बाविस्कर, सनी बाविस्कर यांच्यासह अन्य एक जण गुलाल उधळत असतांना त्यांनी शुभम सोनवणेच्या अंगावर गुलाल फेकला. ओम सोनवणे हा त्यांना बोलण्याकरीता गेला असता, त्यांनी दोघ भावांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेले दगड फेकून मारले. तसेच तिघांपैकी एकाने दगडफेकल्यानंतर लाकडी दांडक्याने शुभम सोनवणे याच्या कमरेवर मारहाण केल्यामुळे तो जखमी झाला.
दगडफेकीत चारचाकीचे नुकसान
तिघांकडून झालेल्या दगडफेकीत त्या परिसरात राहणारे ओम सोनवणे यांचे नातेवाईकांची चारचाकी वाहनाची तोडफोड झाली असून नुकसान झाले आहे. याप्रकरणी ओम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

















