चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जामदा येथे अतिक्रमणाच्या वादातून प्राणघातक हल्ला करण्यासह जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी कठोर शासन केले जाईल तसेच गुन्ह्याचा तपास योग्य रितीने करण्यात येईल, अशी ग्वाही चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सकाळी मेहूणबारे पोलीस ठाण्यात भेट देवून जामद्याच्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर जामदा गावात ज्या भागात दंगलीचा प्रकार घडला त्या भागाची पाहणी केली व दोन्ही गटांतील नागरीकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे, उपनिरीक्षक योगेश ढिकले आदी उपस्थित होते.
गावात शांतता राखण्याचे आवाहन करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुचना केल्या. कायदा कुणीही हातात घेऊ नये, जर कुणी कायद्याचे उल्लंघन केले त्याला थारा दिला जाणार नाही, कठोर शासन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान येथे गावात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगलीतील गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेचे धाडसत्र सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.