जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्ताईनगरमध्ये सभा रद्द करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. परंतू आता मुक्ताईनगरमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. एकप्रकारे शिवसेनेकडून शिंदे गटाला आता ओपन चॅलेंज देण्यात आलं आहे.
जळगावमध्ये सभा घेण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सभेला परवानगी नाकारल्यानंतर सभा घेण्याचा पवित्रा घेऊनही पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजर कैदेत ठेवून मुक्ताईनगरकडे जाण्यास रोखले होते. त्यामुळे मुक्ताईनगरची महाप्रबोधन सभा होऊ शकली नाही त्यामुळे आता मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचा ठाकरे गटाने निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी याबाबत माहिती दिलीय.
सुषमा अंधारे गेल्या तीन ते चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी सभा घेऊन गुलाबराव पाटील, किशोर आप्पा पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या दोन दिवसात जळगावत मोठा राजकीय राडा देखील झाल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या या दौऱ्यानंतर सुषमा आता बीड जिल्ह्यातील परळीच्या दिशेला रवाना झाल्या आहेत. जळगाव येथील हॉटेल केपी प्राइड येथून सुषमा अंधारे यांचा ताफा परळीकडे रवाना झाला. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत व फुलांचा वर्षाव करत सुषमा अंधारे यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यात आला. दरम्यान, लवकरच मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहे. ती कुठे आणि कधी होणार या सभेची तारीख त्यानुसार घोषित करण्यात येणार आहे असंही, संजय सावंत यांनी स्पष्ट केलं.