पिंप्राळा भागातील व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) येथील पिंप्राळा भागातील मयूर कॉलनीतील सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी दुपारी ५ ते ६ वाजेच्या सुमारास एक तरुण संशयास्पद परिस्थितीत मृत झाला. मृत्यूच्या कारणावर शंका व्यक्त करत नातेवाईकांनी आक्षेप घेतला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मृत युवकाचे नाव चेतन विकास अत्तरदे (वय ३२, रा. विठोबा नगर, खेडी रोड, जळगाव) आहे. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि ७ वर्षांचा मुलगा यांच्यासह तो राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबईतील नोकरी सोडून जळगावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.
चेतनच्या नातेवाईकांच्या मते, त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन आले होते. एकदा ते घराच्या कामासाठी बाहेर गेले असता, त्यांना चेतनला शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांचा आरोप आहे की, चेतनला काही इंजेक्शन देण्यात आले आणि त्याचा साईड इफेक्ट होऊन त्याचा मृत्यू झाला.
तर दुसरीकडे, सदभाव व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अशोक शुक्ला यांनी सांगितले की, चेतन आणि त्याचे २-३ मित्र केंद्रात आले होते. त्यावेळी चेतन झोपला आणि काही वेळाने त्याला उठवले असता, तो उठला नाही. त्यानंतर केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चेतनला शासकीय रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
सद्याच्या परिस्थितीत, मृत्यू हा संशयास्पद असल्यामुळे शवविच्छेदन करण्यात येत आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात आक्रोश केला असून, रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु आहे.