
धरणगाव, (प्रतिनिधी) : घर बंद करून बाहेर जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच घरफोडी व चोरीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, असे आवाहन धरणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
घर बंद करताना सर्व दरवाजे व खिडक्या व्यवस्थित अँटी लॉक कराव्यात. घराबाहेरून घर बंद असल्याचे सहज लक्षात येऊ नये, यासाठी घरातील दिवे लावून ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. घरामध्ये तसेच घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा अलार्म बसवावेत. मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घरात ठेवण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी ठेवावी. गोदरेजच्या कपाटात किंवा कुलूपबंद ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये. फेरीवाले, भंगारवाले, दागिने पॉलिश करणारे किंवा किरकोळ दुरुस्ती करणारे व्यक्ती घरात येत असल्यास आवश्यक ती काळजी घ्यावी. घर बंद करून बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना प्रवासाची किंवा घर बंद असल्याची माहिती द्यावी. रात्रीच्या वेळी घराबाहेरील परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा.
घराच्या परिसरात रात्रीच्या वेळी संशयित व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ धरणगाव पोलिसांना कळवून ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर प्रवासाची माहिती टाळा
घर सोडून जाताना सोशल मीडियावर प्रवासाची घोषणा किंवा माहिती पोस्ट करू नये. घराच्या मुख्य दरवाजाला कडी-कुलूपासोबत अँटी डबल लॉक व सुरक्षा चेनचा वापर करावा. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. ड्रायव्हर तसेच सुरक्षा रक्षक यांची स्वतंत्रपणे पोलिस पडताळणी करून घ्यावी.
परिसरात संशयास्पद वाहन किंवा व्यक्ती आढळल्यास वाहन क्रमांकाची नोंद करून त्याचा फोटो काढावा आणि तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. रात्री खिडकीबाहेर संशयास्पद व्यक्ती आढळल्यास ११२ वर संपर्क साधावा.
“एक छोटीशी बेपर्वाई, मोठे नुकसान करू शकते. सावध राहा, सुरक्षित राहा,” असा संदेश धरणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने नागरिकांना देण्यात आला आहे. आपली सतर्कता, आपली सुरक्षा आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता यासाठी नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
















