
नाशिक (प्रतिनिधी) – शेअर बाजारात अल्प कालावधीत भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील दोघांना तब्बल ९४ लाख ६७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामांकित वित्तीय कंपन्यांशी मिळतेजुळते बनावट अॅप्स, व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि नफ्याचे बनावट स्क्रीनशॉट्स दाखवून भामट्यांनी द्वारका परिसरातील एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ५४ लाख ५१ हजार रुपयांची, तर तिडके कॉलनीतील एका ५६ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाची ४० लाख १६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. दोन्ही घटनांप्रकरणी शहर सायबर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना द्वारका परिसरात घडली. येथील एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला इन्स्टाग्रामवर शेअर मार्केट ट्रेडिंगसंदर्भातील जाहिरात दिसली होती. त्यात नामांकित कंपनीचे नाव सांगून तब्बल ९८० टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देण्याचा दावा करण्यात आला होता. जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संशयितांनी त्यांना अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी त्यांना काही रक्कम नफ्यासह काढून दिली. मात्र, नंतर मोठ्या गुंतवणुकीच्या नावाखाली विविध बँक खात्यांवरून तब्बल ६३ लाख ५१ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. अॅपमधील खात्यावर ३ कोटी ७२ लाखांहून अधिक नफा दिसत असताना, ही रक्कम काढण्यासाठी भामट्यांनी थेट ४७ लाख रुपयांच्या कमिशनची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या ज्येष्ठ नागरिकाला ९ लाख रुपये परत मिळाल्याने त्यांची निव्वळ ५४ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
दोन्ही प्रकरणांत सायबर पोलिसांनी अज्ञात संशयित, बनावट अॅप्सचे चालक, व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन्स आणि ज्या बँक खात्यांवर पैसे वर्ग झाले त्या खातेधारकांविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
लिंकवर क्लिक केले ३ अन्…
दुसऱ्या घटनेत, तिडके कॉलनी परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून शेअर बाजाराची लिंक आली. त्यावर क्लिक करताच ते एका इन्व्हेस्टर ग्रुपमध्ये जोडले गेले. त्यानंतर एका संशयित महिलेने संपर्क साधून त्यांचे अॅपवर ट्रेडिंग खाते उघडले. सुरुवातीला खरेदी केलेल्या शेअर्सवर चांगला परतावा देऊन त्यांचा विश्वास जिंकण्यात आला आणि त्यांनी टप्याटप्याने ४५ लाख २६ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांवर जमा केले. त्यांनी ५ लाख ९ हजार रुपये काढल्यानंतर खात्यावर ५९ लाखांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक दिसत होती. मात्र, ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी आणखी ७५ लाखांची मागणी केली आणि अॅप बंद पाडले. या प्रकारात त्यांची ४० लाख १६ हजार २३ रुपयांची फसवणूक झाली.















