धरणगाव (प्रतिनिधी) ‘एक घोडा दो दुल्हे निकल गये’ कोडवर्डच्या सहाय्याने धरणगावच्या व्यापाऱ्याचे ११ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे एलसीबीच्या पथकाला यश आलेय. धुळे एलसीबीकडून सहा जणांच्या टोळीतील पाच संशयितांना अटक करण्यात आले असून एक फरार आहे.
धरणगाव शहरातील अतुल लक्ष्मीनारायण काबरा या धान्य व्यापाऱ्याकडील ११ लाख रुपये धुळ्याजवळ लुटल्याची खळबळजनक घटना १८ जुलै रोजी सायंकाळी घडली होती. महामार्गावर व्यापाऱ्यांना जबरीने लुटणाऱ्या टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेला पर्दाफाश करण्यात यश आले आहे. या संदर्भात अधिक असे की, दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 06.45 वाजेचे सुमारास किशोर पंढरीनाथ पाटील (व्यवसाय-मुनीम, रा.धरणगाव जि. जळगाव) व अतुल लक्ष्मीनारायण काबरा असे दोघंही जण श्री रत्न ट्रेडींग, जे.बी. रोड, धुळे येथून सोयाबीन विक्रीचे 10 लाख 91 हजार 900 रुपये घेवून त्यांची मोटार सायकल क्र.(MH- 19/BE-1807) च्या डिक्कीत ठेवुन धरणगाव येथे जात असतांना फागणे गावाच्या पुढे दोन अनोळखी तरुण मोटार सायकलवर येत किशोर पाटील यांना तू माझ्या बहिणीचे नाव का घेतले?, असे सांगून चालती मोटार सायकलीस लाथ मारुन खाली पाडुन, त्यांना गंभीर दुखापती केली. तसेच मोटार सायकलच्या डिक्कीतून रोकड घेऊन पळ काढला होता.
या घटनेबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.497/2024 BNS क.309 (6) (3) (5) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. तर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना घटनेची माहिती मिळताच पथकासह घटनास्थळी हजर झाले. व तेथील परिस्थितीजन्य परिस्थितीचा अभ्यास करुन, किशोर पाटील यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेत दोन पथके तयार केले. या पथकाने जे.बी. रोड ते घटनास्थळा पर्यंतचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून बारकाईने विश्लेषण केले असता, प्रत्येक फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची अॅसेस मोपेड मोटार सायकल दोन तरुण जातांना आढळून आले. त्यांच्या हालचाली संशयीत दिसून आल्याने पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविली.
पोलिसांनी श्री रत्न ट्रेडींग येथील कामास असलेला (1) यश विश्वनाथ ब्रम्हे, (वय-22 वर्ष, रा. पवननगर, चाळीसगावरोड, धुळे) याच्या हालचाली संशयास्पद दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता, त्याने सदर गुन्हयाची कबुली देवुन, त्याचे साथीदार (2) राहुल अनिल नवगिरे (वय-22 ररा. पवननगर, चाळीसगावरोड, धुळे (फरार), (3) चंद्रकांत रविंद्र मरसाळे (वय-21 वर्ष, रा. मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे) (4) कल्पेश शाम वाघ )वय-26 वर्ष, रा. पवन नगर हुडको, चाळीसगावरोड, धुळे), (5) राहुल शाम वाघ, (वय-31 वर्ष, रा. पवन नगर हुडको, चाळीसगावरोड, धुळे) व (6) सनी संजय वाडेकर (वय-28 वर्ष, रा. मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे) यांच्यासह कट रचून लुटपाट केल्याचे आढळून आले आहे.
धरणगावकडे जाण्यास निघाल्याचा राहुल नवगिरे यास त्याचे मोबाईलवर “एक घोडा दो दुल्हे निकल गये”, असे कोडवर्डच्या माध्यमातुन बोलुन वरील नमुद संशयित आरोपीतांनी वेगवेगळ्या मोटार सायकलींवर ठिकठिकाणी थांबुन पाठलाग करत 10 लाख 91 हजार 900 रूपये लुटून पळून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे सदर आरोपीतांनी गुन्हयातील चोरीस नेलेल्या रकमेपैकी 6 लाख 84 हजार रुपये काढून दिले आहेत.