लखनऊ (वृत्तसंस्था) आग्रा येथे नऊ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या आणि दरोडा टाकल्याप्रकरणी दोन दोषींना जन्मठेपेची नुकतीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोपटाची साक्ष पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत घेऊन गेली.
घरात घुसून खून करून दागिने व रोख रक्कम लुटून काढला पळ
21 फेब्रुवारी 2014 रोजी आग्रा येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात घुसून निलिमा शर्मा नामक महिलेचा खून करून दागिने व रोख रक्कम लुटून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
मारेकऱ्याचे नाव घेताच पोपट जोरात ओरडू लागला
एका वृत्तपत्राचे संपादक विजय शर्मा हे कुटुंबासह लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी फिरोजाबादला गेले होते. त्यांची पत्नी नीलम एकट्याच घरी होत्या. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात घुसून त्यांची हत्या करून दागिने व रोख रक्कम लुटून पळ काढला होता. विजय शर्मा यांच्या घरात एक पाळीव पोपट होता. या घटनेनंतर पोपटाला वाईट वाटू लागले. घरच्यांना संशय आला म्हणून त्यांनी पोपटाच्या समोर अनेकांची नावे घ्यायला सुरुवात केली. विजय शर्मा यांचा भाचा आशुतोष गोस्वामी उर्फ आशू याचे नाव घेताच पोपट जोरात ओरडू लागला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी आशूला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
पाळीव कुत्र्यालाही मारले
तपासात पोलिसांना आशूच्या शरीरावर कुत्र्याच्या चाव्याच्या खुणा आणि जखमा आढळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला मित्र रॉनी मेस्सीसह नीलम शर्माची हत्या केल्याची कबुली दिली. मारेकऱ्यांनी महिलेच्या पाळीव कुत्र्यालाही मारले होते. विशेष बाब म्हणजे कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमेच्या खुणा आणि पोपटाची साक्ष पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत घेऊन गेली. महिलेची हत्या करणाऱ्या दोषींपैकी एक हा महिलेचा भाचा आहे. दरम्यान, नऊ वर्षांपूर्वी हत्या आणि दरोडा टाकल्याप्रकरणी दोन दोषींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.