जळगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांच्या नाराजीनंतर एकनाथ खडसे यांनीभाजपला सोडचिट्ठी देत नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक देखील राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसतायेत. अशातच आज जळगावात भाजपच्या ६० पदाधिकाऱ्यांनी खडसे यांच्या उपस्थितीत हातावर ‘घड्याळ’ बांधलं. यावेळी बोलताना खडसे यांनी भाजपविरोधात गर्जना केली आहे.
काय म्हणाले खडसे?
“आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील,” अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली.
दरम्यान, आज जळगावात भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी हातावर घड्याळ बांधत भाजपला सोडचिठ्ठी दिली. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. खडसेंपाठोपाठ त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीत येत असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाली आहे.
दरम्यान खडसेंच्या पक्षांतरानंतर जळगावातील भाजपचे बडे नेते गिरीश महाजन यांनी, ‘खडसे गेल्यानेकोणताही फरक पडणार नाही’ असा निशाणा साधला होता. या टीकेला उत्तर देताना खडसेंनी कुणाच्या पाठीमागे किती लोक उभे आहेत हे लवकरच समजेल असा पलटवार केला.