बीड (वृत्तसंस्था) गुप्त धनासाठी अल्पवयीन मुलीचा नरबळी देण्यासाठी तरुणीच्या वडीलाकडे तिची मागणी करणाऱ्या कोटन येथील कथित ८० वर्षीय मांत्रिकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाराव रघुनाथ घोशीर (वय ७५, रा. कोतन, ता. पाटोदा) असे या भोंदू मांत्रिकाचे नाव आहे.
बीड कल्याण महामार्गावर पाटोदा तालुक्याच्या सरहद्दीजवळ कोतन हे गाव आहे. या ठिकाणी एक मजूर परिवार वास्तव्यास आहेत. तर गावातील तांत्रिक दादाराव रघुनाथ घोषीर याची या मजुरासोबत ओळख होती. १८ ऑक्टोबर रोजी तांत्रिक भाऊसाहेब हा मजुराच्या घरी गेला होता, त्याने तुला सोने, नाणे मिळवायचे असेल तर नरबळी द्यावा लागेल, असे त्याला सांगितले. एवढेच नव्हे तर तुझी मुलगी पावणे सहा ते सहा फूट उंचीची आहे. तिची रास आमच्या नियमांमध्ये बसते. तिला पुण्याला घेऊन जायचयं तिला देवी सारखं सजवायचे, तिची पूजा करायची, पूजा झाल्यानंतर सोनं नाणे तुला मिळेल पण तिचा बळी द्यावा लागेल असं सांगितले. तांत्रिक दादारावची ही मागणी ऐकून मजूर बिचाराप्रचंड घाबरला. त्याने तांत्रीकाला मला एकुलती एक मुलगी आहे मी देणार नाही. मी याबाबत तक्रार करेल असं सांगितले. त्यावर तांत्रिक दादारावने संबंधित मजुराचे पाय धरले आणि घडला प्रकार कोणाला सांगू नकोस माझी इज्जत जाईल असे म्हणून निघून गेला.
तांत्रिकाच्या भीतीपोटी मजूर काही दिवस शांत राहिला. त्यानंतर मात्र, संपूर्ण प्रकार पत्नीस आणि गावकऱ्यांना सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांनी बैठक बोलून तांत्रिक दादारावला जाब विचारला तर त्याने गावकऱ्यांसोबत अरेरावी केली. गावकऱ्यांनी पिडीत मजुराला सोबत घेऊन अमळनेर पोलीस ठाणे गाठले. तेथे गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन मांत्रिकाच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करत भोंदू तांत्रिकाला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.