जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील डी.सेक्टरमध्ये असलेल्या कंपनीतून ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, नेहरु चौक परिसरातील रहिवासी सोनाली रमेश महाजन (वय ४५) यांची एमआयडीसीतील डी सेक्टर डी-११ येथे डांबरची कंपनी आहे. १० ऑक्टोंबर रोजी सोनाली महाजन यांना त्यांच्या कंपनीत काम करणारे प्रशांत किशन मानकर व सुनील ईश्वरकर यांचा फोन आला. कंपनीत केबल वायर, मोटार इलेक्ट्रीक फिटींग वायर व कॅबीनमधील वॉल व किरकोळ सामान, येल्बोसह (एम.एच.१९ जे.७०३०) या क्रमांच्या डांबरच्या टँकरच्या दोन बॅटर्या असा ऐवज चोरीस गेलेबाबत त्यांनी कंपनी मालक महाजन यांना माहिती दिली. त्यानुसार सोनाली महाजन यांनी दुसर्या दिवशी ११ रोजी कंपनीत जावून पाहणी केली. चोरीची खात्री झाल्यावर बुधवार, १३ ऑक्टोंबर रोजी सोनाली महाजन यांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. तक्रारीवरुन कंपनीतून १ हजार ५०० रुपयांची ५ फुट तांब्याची केबल वायर, ५०० रुपयांची मोटार फिटींगची वायर, १ हजार ५०० रुपयांचे कॅबीनमधील वॉल व किरकोळ सामान, येल्बो, १ हजार रुपयांच्या लोखंडी भंगाराच्या ४ गोन्या, ७ हजाराच्या वाहनाच्या दोन बॅटरी असे एकूण ११ हजार ५०० रुपयांचे साहित्य लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.