जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेची इतकी अधोगती कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत’, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले होते. त्यावर ‘ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा ढासळला, तेव्हा भाजपच्या ७२ नेत्यांनी बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे तेव्हा का कबूल केले नाही?, याचे उत्तर महाजनांनी आधी द्यावे, मग हिंदुत्त्व सिद्ध करावे’, अशा शब्दांत शिवसेना नेते मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे.
मंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपाच्या ७२ नेत्यांनी तेव्हा बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे का कबूल केले नाही. तेव्हा एकच बाप होता बाळासाहेब ठाकरे; ज्यांनी सांगितले पाय नाही हात आहे, हात नाही पाय आहे, याचे उत्तर गिरीश महाजन यांनी द्यावे, असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारावर बोलताना, ‘आता कारवाई सुरू आहे, त्यावर बोलणे उचित होणार नाही. पण ज्यांनी चुकीचे काम केले आहे, त्यांना चुकीच्या कामाचे प्रायश्चित्त करावे लागेल. चौकशी होऊ द्या, जे दोषी असतील ते समोर येतील’, अशी प्रतिक्रियाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
काय म्हणाले होते गिरीश महाजन?
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काल जळगावात असताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. ‘शिवसेना आपल्या मूळ तत्वांपासून बाजूला जाऊन अशी भरकटेल, असा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता. काँग्रेस व एमआयएमच्या पुढे जाऊन शिवसेनेने हिंदुत्व विरोधी काम करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेची इतकी अधोगती कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत’, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी टीकास्त्र डागले होते.