जळगाव (प्रतिनिधी) प्रसाद लाड यांच्या सारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून सेना भवन फोडण्याचे शब्द शोभत नाहीत. हिम्मत असेल तर प्रयोग करून बघा आम्ही तुमचे काय काय फोडू हे पाहाच, असे आव्हान शिवसेना नेते व राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. पाटील यांनी शनिवारी रात्री अजिंठा विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हे जोरदार प्रत्युत्तर दिले.
भारतीय जनता पक्षाच्या माहीम येथील कार्यालयाबाहेर शनिवारी पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. राणे कुटुंबीयांना मानणारे कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यामुळं भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. त्यामुळं ते (शिवसैनिक) घाबरून गेले आहेत. आम्ही नुसते माहीममध्ये आलो तरी भाजपवाले शिवसेना भवन फोडायला आले आहेत की काय, असंच त्यांना वाटतं. पण घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू,’ असं लाड यांनी म्हटलं होतं.
यावर ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, लाड यांच्यासारख्या व्यापारी माणसाने अशी भाषा करणे योग्य नाही. मात्र, जर त्यांनी तसा इशाराच दिला असेल तर लाड यांनी सेना भवन फोडण्याची हिंमत करून दाखवावी, मग आम्ही त्यांचे काय काय फोडू हे पहाच, असे आव्हान थेट लाड यांना दिले आहे.
महाजन जामनेरमधून थेट कोकणात मदतीला जाताय त्यांचे अभिनंदन. मात्र,…
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी कोकणातील पूरग्रस्तांच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये. ही वेळ राजकारण करण्याची नसून, पूरग्रस्तांना मदत करण्याची वेळ आहे. महाजन जामनेरमधून थेट कोकणात मदतीला जात आहेत. त्यांचे अभिनंदन. मात्र जामनेर मध्ये काय सुरू आहे. याकडे देखील त्यांनी लक्ष द्यायला हवे. पंचनामे बाकी आहेत. ते पूर्ण झाल्यानंतरच मदत करता येणार आहे. शासनाने सध्या दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, यावर देखील शासन पुढे काम करत राहणार असल्याचे पाटील यांनी सागितले.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – प्रसाद लाड
दरम्यान, हे प्रकरण चिघळल्याचं लक्षात येताच प्रसाद लाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे. ‘मी असं बोललोच नव्हतो. मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे,’ असं लाड यांनी म्हटलं आहे.